जेएसडब्ल्यूच्या प्रदूषणाने जनता हैराण,
पर्यावरण विभागाच्या पूर्वअटीनुसार कंपनीने झाडांची लागवड केली नसल्याने प्रदुषणाचा त्रास.
वडखळ येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचा आरोप.
https://alibagreporter.business.site/




पेण - तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाने परिसरातील अनेक गावांना विळखा घातलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीला पर्यावरण परवानगी देताना परिसरातील प्रदुषण कमी होण्यासाठी काही एकर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्याचयी अट टाकण्यात आली होती.परंतु कंपनीने थातूरमातूर झाडे लावून शासनाची फसवणूक केली असून अटी व शर्तींप्रमाणे वृक्ष लागवड केली नसल्याचा आरोप वडखळ येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर विठोबा पाटील यांनी केला आहे. कंपनीने खाडी क्षेत्रातील कांदळवनाचीही मोठी तोड केली असून कंपनीवर गुन्हा दाखल होवूनही असे प्रकार वारंवार होत असल्याचे मनोहर पाटील यांनी सांगितले आहे. मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाने या कंपनीवर कारवाई करावी व डोलवी परिसरात प्रदूषण मापक यंत्र बसवावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
प्रदूषण ही नागरिकांची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या प्रदूषणामुळे डोलवी,आमटेम, पांडापूर, कासू, काराव,नवेगाव, गडब, वडखळ, शहाबाज, या भागातील ग्रामस्थ खूप अस्वस्थ आहेत. हे प्रदूषण कधी संपणार की नाही, असे रहिवाशांचे प्रश्न आहेत. कोटयवधी रुपये कर वसूल करणा-या शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजताना किंवा प्रदुशण कमी करण्यासाठी कंपनीवर दबाब निर्माण करताना दिसत नाहीत. लोकप्रतिनिधींना या सततच्या विषयाचे गांभीर्य राहिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रदूषणाच्या विषयावर नक्की करते काय असा प्रष्न निर्माण झाला आहे.
डोलवी,आमटेम, पांडापूर, कासू, गडब, वडखळ, शहाबाज,या विभागात जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाने ग्रामस्थांना त्रास होत आहे. हा कारखाना होण्यापूर्वी हा मोकळा परिसर होता. गर्द झाडांनी भरलेला असल्याने असल्याने त्यावेळी हा विभाग प्रदुशणमुक्त होता. कालांतराने या विभागात कारखाना सुरू झाल्याने घराच्या दारात दररोज खटखट, धूर दिसत असल्याने प्रदूषण हा विषय अधिक प्रमाणात ऐरणीवर आला आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या या भयानक प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, खोकला यांसारख्या विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या प्रदूषणामध्ये हवेतून लोहमिश्रीत डस्ट बाहेर पडत असल्याने या परिसरातील भातशेतीवर देखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. अशा प्रकारे या कंपनीने जनतेच्या जीवनाशी खेळ मांडलेला आहे. तरीदेखील प्रदुषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतेय? असा सवाल परिसरातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या विस्तारित प्रकल्पामुळे तर हे प्रदुषण दुपटीने वाढणार असून त्यामुळे या परिसरातील जनतेला जगणे कठीण होणार आहे. परिणामी शासनाने या कंपनीवर कारवाई करुन येथे प्रदूषण मापक यंत्र बसवावे व नागरिकांना प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे